Monday, 3 December 2012

सिनेजगतात


सिनेजगतात

' शुभकल्याण फिल्म्स ' यांची निर्मिती असलेल्या ' या टोपीखाली दडलंय काय ?' या सिनेमाचं शूट आता पूर्ण झालंय. कोल्हापूर आणि परिसरात हे शुटिंग झालं. गांधी टोपी घालून राजकारण करतानाच त्या टोपीआड असलेल्या कावेबाज डावपेचांना या सिनेमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. एका राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. अरविंद जगताप यांची कथा या सिनेमाला लाभली असून , यात अशोक सराफ , मकरंद अनासपुरे , सुवर्ण काळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमातल्या चार गाण्यांना दिवंगत संगीतकार बाल पळसुले यांनी संगीत दिलं असून वैशाली सामंत , नंदेश उमप , कविता निकम यांनी ही गाणी गायली आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दत्ताराम तावडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सरपंच येतोय

' शिवकुमार लाड प्रोडक्शन्स ' ची पहिलीच निर्मिती असलेल्या ' सरपंच भागीरथ ' या सिनेमाचं शुटिंग नुकतंच सुरू झालं. शीघ्रकवी रामदास फुटाणे हे आपल्या ' सुर्वंता ' या पहिल्या सिनेमानंतर बऱ्याच वर्षांनी दुसरा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. त्यांच्या सोबत असतील , शाहीर संभाजी भगत. या सिनेमाच्या निमित्ताने भगत पहिल्यांदाच मराठी सिनेमाला संगीत देणार आहेत. उपेंद्र लिमये , किशोर कदम , डॉ. मोहन आगाशे आणि वीणा जामकर हे कलाकार या सिनेमा मुख्य भूमिकेत चमकणार आहेत. आसाराम लोमटे यांच्या कथेवर हा सिनेमा बेतला आहे. याचे संवाद स्वतः फुटाणे यांनीच लिहिले आहेत. या सिनेमाचं शूट सध्या पुण्यात सुरू असून , पुढच्या वर्षी तो प्रदर्शित होईल.

No comments:

Post a Comment